इन्स्पायर अवॉर्ड

'इन्स्पायर ऍवॉर्ड' योजना


केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचा INSPIRE (Innovation in Science pursuit for Inspired Research) हा इयत्ता ६ वी ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण व संशोधनासंबंधीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शालेयस्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील संशोधन व विकास यासाठी त्यांना सक्षम करणे असा आहे. याची अधिक माहिती घेऊया आजच्या आलेख मध्ये...

'इन्स्पायर' या कार्यक्रमाचे पाच अंगभूत असून यापैकी 'इन्स्पायर ऍवॉर्ड' हा पहिला भाग आहे. 

'इन्स्पायर ऍवॉर्ड' ही योजना प्रत्येक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी निगडीत आहे. 

या योजनेद्वारे शालेय स्तर पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांमधील प्रज्ञेस (Talent) अधिकृत मान्यता/ओळख देण्यात येते.

'इन्स्पायर ऍवॉर्ड' या योजनेत दरवर्षी २ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकरकमी ५ हजार रुपये 'ऍवॉर्ड' प्रमाणपत्रासह देण्याची केंद्र शासनाने तरतूद केलेली आहे.

या योजनेकरिता प्रत्येक शाळेतील २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना 'इन्स्पायर ऍवॉर्ड' देण्यात येणार असून यासाठी शाळेच्या मुख्याध्यपकांनी इयत्ता ६ वी ते १० वी मधील २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या निकषावर करावयाची आहे. 

यासाठी वेगळे निकष विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने निश्चित केलेले नाहीत.

प्रत्येक शाळेने इयत्ता ६ वी ते ८ वी मधील प्रत्येकी एक विद्यार्थी याप्रमाणे तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याची तसेच इयत्ता ९ वी, १० वी मधील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याची म्हणजेच प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थ्यांची 'इन्स्पायर ऍवॉर्ड' साठी शिफारस करावयाची असून याबाबतचा प्रस्ताव विहित प्रपत्रामध्ये जिल्हास्तरावर सादर करावयाचा आहे.

या योजनेत इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत वर्ग असणार्‍या प्रत्येक शासनमान्य माध्यमिक शाळांचा (सर्व व्यवस्थापनाच्या/ माध्यमाच्या/अनुदानित/ विना अनुदानित) आणि इयत्ता ६ वी, ७ वी चे वर्ग असणार्‍या उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

प्रत्येक शासनमान्य शाळेने विहीत प्रपत्रातील प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करावयाचा आहे. विहीत प्रपत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रत्येक शाळेस उपलब्ध होणार आहे.

या योजनेत विद्यार्थ्यांस एकवेळ एकरकमी ५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून यापैकी ५० टक्के रक्कम विज्ञान प्रकल्प/विज्ञान प्रतिकृती तयार करण्यासाठी आणि उर्वरित ५० टक्के रक्कम जिल्हास्तरीय प्रदर्शनात आपली प्रदर्शनीय वस्तू (विज्ञान प्रकल्प/प्रतिकृती) मांडण्यासाठी वापरावयाची आहे.

यामध्ये त्याचा प्रवासाचा खर्च समाविष्ट आहे.

या योजनेसाठी प्रत्येक शाळेने सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांची रक्कम राज्य समन्वय अधिकार्‍यामार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/शाळांना पाठविण्यात येईल.

बँकेतून पारितोषिकाची रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांस बँकेचे खाते काढण्याची गरज नाही.

आवश्यक माहितीसाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा जिल्हा समन्वय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

अधिकच्या माहितीकरिता संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर तथा सहाय्यक राज्य समन्वय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. (दूरध्वनी क्रमांक ०७१२/२५६२९८९)

No comments: