Sunday, March 22, 2015

आज जागतिक जल दिन

'नळ गळती थांबवा पाणी वाचवा' ही काही कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा नाही, तर हा संकल्प आहे एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांचा. विविध स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून 'एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान' राबविण्यात येत असून याअंतर्गत शहर परिसरातील १७ शाळांमध्ये गळणारे १०२ नळ बदलण्यात आले आहेत. नळ 'सार्वजनिक' असला तरी पाणी 'आपले'च आहे हा या अभियानाचा उद्देश आहे.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून शनिवारी (२२ मार्च) चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गोखलेनगर येथील जनता वसाहत येथे 'गळके नळ मुक्त शहर' अभियानाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. दरोडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा जगताप यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवार, विविध रोटरी क्लब, वसुंधरा स्वच्छता अभियान, मिलन मैत्री परिवार, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, राष्ट्र सेवा दल यांचा या अभियानामध्ये सहभाग आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. पाणीटंचाई आहे म्हणून नव्हे, तर एकूणच पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरणे गरजेचे आहे. नळ सार्वजनिक असला तरी पाणी आपलेच आहे, ते एकाच धरणातून येणारे आहे. कुठूनही पाणी वाया गेले तरी धरणातील पाणी कमी होणार आणि उद्या आपल्याला कमी मिळणार हा विचार सर्वाच्या मनात रुजविणे यासाठी हे अभियान आहे. करंगळीच्या निम्मे पाणी सतत वाहत असेल तर वर्षांला सुमारे पाच लाख लिटर पाणी वाहून जाते. बाहेरगावी गेल्यावर २० रुपयांची पाण्याची बाटली घेऊन आपण पितो. मग, एक कोटी रुपयांचे पाणी वाहून जाताना थांबविणे गरजेचे आहे. 

No comments: