Friday, December 27, 2013

गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांची ९०० वी जयंती

: भास्कराचार्य :


       प्राचीन भारतातील महान गणितज्ज्ञ व शास्त्रज्ञ म्हणून भास्कराचार्य ओळ्खले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सन १११४ मध्ये झाला. १८ व १९ जानेवारी असे दोन दिवस पाटणदेवी परिसरात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांची ९०० वी जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०१४ च्या प्रारंभी जयंती वर्षाला विविध कार्यक्रमाद्वारे सुरुवात होईल.

      त्यांचे वडील उत्कृष्ट गणितज्ज्ञ होते  त्यांचाकडेच त्यांनी गणिताचा श्रीगणेशा केला. आणि मग आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याच्या बळावर "भास्कराचार्य म्हणून नाव कमावले. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी म्हणजे सन ११५० मध्ये त्यांनी "सिद्धांन्तशिरोमणी" हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये चार भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये अंकगणिताचे ज्ञान आहे. हा भाग काव्यात्मक आहे. या भागाला त्यांनी आपल्या मुलीचे "लिलावती" असे नाव दिले. या भागाला "पाटी गणित" असेही म्हणतात. त्याकाळात वापरात असलेल्या वजनामापाच्या एककापासून सुरूवात करून त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ इत्यादि प्रमुख वीस अंकगणितीय क्रियांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच त्रिकोण, चौकोन, वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, कोन, पिरॅमिड्स, आदि भौमितिक आकृत्यांबाबतचे सिद्धांत व त्यावरील सोपी व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत. दुसरा भाग बीजगणिताचा आहे. त्यामध्ये धन व ऋण चिन्हांची कल्पना मांडली आहे. याशिवाय शून्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. बीजगणिताची मांडणी सोपी व सुटसुटीत करण्यात भास्कराचार्यांचा मोलाचा वाटा आहे. सिद्धांतशिरोमणीचे "महागणिताध्याय""गोलाध्याय" असे आणखी दोन भाग असून त्यामध्ये भास्कराचार्यांनी ग्रह व त्यांची गती, अवकाश आदिंची चर्चा केली आहे. दिवसापेक्षाही कमी कालावधीत सूर्याच्या स्थानात सतत बदल होत असतो व हा बदल सर्व कालावधीत सारखाच असतो, हे त्यांनी दाखवून दिले.

No comments: